🌸 फुलाकडून काय शिकावं 🌸

फुलाकडून शिकावं हसत उमलायला,
जखमांच्या मातीतही रंग भरायला।
काट्यांच्या सान्निध्यात वाढूनसुद्धा,
दुसऱ्याला दुखावू नये, हेच खरं शहाणपण कळायला।

फुलाकडून शिकावं सुगंध देणं,
स्वतः झिजूनही इतरांचं मन फुलवणं।
कोणी तोडलं, चिरडलं, तरीही,
तक्रार न करता आपलं सौंदर्य देणं।

फुलाकडून शिकावं क्षणभंगुर असणं,
आज आहे उद्या नाही. हे सत्य मानणं।
म्हणूनच प्रत्येक क्षण जपून जगणं,
आयुष्याचं मोल ओळखून चालणं।

फुलाकडून शिकावं रंगभेद विसरणं,
सर्वांसाठी सारखं उमलणं, दरवळणं।
मंदिर, घर, चितेवरही सारखंच राहणं,
सेवेतच आपलं खरं अस्तित्व पाहणं।

फुलाकडून शिकावं निसर्गाचं भान,
न मागता देणं. हाच खरा सन्मान।
माणूस झालो तर असा होऊया,
फुलासारखा. मूक, पण महान.

             

              - गणेश चापुलकर