🩸 पायमली 🩸
भावनांची पायमली होते
तेव्हा टाळ्या वाजत नाहीत.
तेव्हा माणूस हळूच
स्वतःलाच गमावतो.
ज्यांच्यासमोर मन उघडं टाकलं,
त्यांनीच त्यावर पाय ठेवले.
हसत-हसत,
जणू काही ते काहीच नव्हतं.
“तू समजून घे”
हे वाक्य इतकं वापरलं गेलं
की वेदनांनाच अपराधी वाटू लागलं.
समजून घेता घेता
माणूस स्वतःलाच विसरतो.
इथे अश्रूंना किंमत नाही,
जोपर्यंत ते दिसत नाहीत.
आणि जेव्हा दिसतात,
तेव्हा उशीर झालेला असतो.
विश्वास तोडताना
हात थरथरत नाहीत लोकांचे,
पण ज्या मनावर घाव बसतो
ते आयुष्यभर थरथरत राहतं.
सगळ्यात क्रूर गोष्ट माहितेय का?
ज्यांनी भावना चिरडल्या
तेच नंतर म्हणतात.
“तू फारच संवेदनशील आहेस.”
नाही…
मी संवेदनशील नाही,
तुम्ही निर्दयी आहात.
आणि हो,
भावनांची पायमली झाल्यावर
माणूस रडत नाही,
तो फक्त हसणं शिकतो.
पण आतून कायमचा मेलेला असतो.
📝- गणेश चापुलकर

0 Comments