भारताची भुमी अनेक थोर महान युग पुरुषांच्या पावन कार्याने संपन्न अशी आहे. या भारत भुमीत अनेक थोर विचारवंत तत्वज्ञे होऊन गेले आहेत. भारताला अनेक थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे. भारतातील अनेक तत्ववेत्यांपैकी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे महान कार्य आपण विसरू शकत नाहीत.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९८८ साली तामिळनाडूू राज्यातील चित्तोर जिल्हयातील तिरुतन्नी या खेडेगावात झाला. तिरुतन्नी हे चेन्नई पासून दक्षिणेला ६४ किमी अंतरावर आहे. सात्विक, सोज्वळ, प्रेमळ, चारित्र्यसंपन्न असे व्यक्तिमत्व असेलेले राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. राजकारणापासून अलिप्त असलेले राधाकृष्णन एक महान तत्वज्ञ होते. त्यांचे तत्वज्ञान जगभर प्रसिध्द आहे. आपल्या जीवन काळात डॉ. सर्वपल्लीराधाकृष्णन यांनी अनेक पदावरची जबाबदारी चांगल्या पध्दतीने पार पाडली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे तत्वज्ञान त्यांनी पाश्चात्य राष्ट्रांना पटवून दिले. त्यांनी भारतीय चिद्वदाचा परिचय करून दिला. त्यांच्या या तत्वज्ञानामुळे ते भारतीय तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ऑक्सफर्ड मध्ये नावाजले गेले. त्यांच्या या महान कार्याची महती जाणून ऑक्सफर्ड विदयापीठानेे राधाकृष्णन यांच्या नावाने ' राधाकृष्णन मेमोरिअल बिक्वेस्ट ' हा पुरस्कार ठेवला आहे.
सहायक प्राध्यापक म्हणून मद्रास प्रेसिडेन्सी काॅॅॅॅॅलेजमध्ये काम केले. सन १९१८-१९२१ या कालावधीत म्हैसूर विदयापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. म्हैसूर विदयापीठाने डॉ. राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला. सन १९२१-१९३१ या कालावधीत कोलकत्ता विदयापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. सन १९३१-१९३६ या कालावधीत आंध्र विदयापीठाचे कुलगुरू म्हणून पदभार सांभाळला. सन १९३९-ते १९४८ या कालावधीत पंडीत मदनमोहन मालविय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विदयापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे १३ मे १९५२ - १२ मे १९६२ या कालावधीत उपराष्ट्रपती पदावर राहिले. १९५४ साली भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा किताब देवून त्यांचा गौरव केला. त्यांनतर ते १३ मे १९६२ ते १३ मे १९६७ या कालावधीत स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदावर राहिले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक कार्य ही महान होते. त्यांना शिक्षणाबद्दल मोठी आस्था होती. मानवी जीवनात शिक्षणाला मोठे महत्व आहे. हे त्यांनी दाखवून दिले. त्यांना शिक्षणाच्या संदर्भात नेहमी तीन प्रश्न असायचे. पहिला प्रश्न म्हणजे नीतिनीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा तयार करता येईल ? त्यासाठी शिक्षणाचा काही उपयोग होईल का ? दुसरा प्रश्न म्हणजे प्राचीन भारतीय तत्वज्ञान जगाला आधुनिक पध्दतीने कसे समजावून सांगता येईल ? प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचे वैभव जगाला कसे पटवून देता येईल ? तिसरा प्रश्न असा होता की, मानव जातीचे भवितव्य घडविण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग कसा करता येईल ? असे नरहर कुरुंदकर आपल्या व्यक्तीवेध या पुस्तकात सांगतात.
शिक्षणक्षेत्रामध्ये चांगले बदल घडवून यावेत यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जीवनभर कष्टत राहिले. समाजाच्या सर्वागिण विकासामध्ये शिक्षकांची भुमिका महत्वाची आहे. समाजाचा विकास आणि उन्नती करण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकातच आहे. समाजाने शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे. शिक्षकांच्या सन्मानातून संस्कृतिचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान होत असतो. जिथे शिक्षकांचा संस्कृतिचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान होतो. ते राष्ट्र सुखसंपन्न होते. देशातील नागरिकाने समाजाला सुसंस्कृत बनवणा-या शिक्षकांचा नेहमी आदर केला पाहिजे.
शिक्षकांच्या बाबतीतही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात, शिक्षकाने आपल्या पवित्र व्यवसायाचे पावित्र्य सदैव जपले पाहिजे. शिक्षक तपाने,ज्ञानाने, चारित्र्याने सतत अग्रस्थानी असावा. एक कुलगुरू, प्राध्यापक व शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले जिवन आदर्शवत केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यात आपल्या शिक्षकी पेशाला न्याय देण्याची मोठी तळमळ होती.ञ ती त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ करून दाखवली. त्यांनी ४० वर्षाच्या कालखंडात आपल्या शिक्षकी पेशाला न्याय मिळवून दिला. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने त्यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचेे जाहिर केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !!
प्रा. गणेश चापुलकर


0 Comments